सोमवार, २७ एप्रिल, २०१५

महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-6

  महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-6

f
महाभारतात देशांच्या नावांची जी एक यादी दिली आहे, त्या यादीत विदर्भानंतर रूपजीविकअश्मक ही दोन राष्ट्रं दिली आहेत. महाराष्ट्राच्या आसपासचे रूपजीविक हे लोक कोण असावेत, याबाबत नक्की सांगता येत नाही. अश्मक हे आधुनिक मराठ्यांचे पूर्वसंबंधी आहेत. त्यासंबंधीचा पुरावा आपल्याला बौद्धग्रंथांत मिळतो. बुद्धाच्या वेळी प्रसिद्ध असलेल्या ज्या सोळा जमातींची यादी बौद्धग्रंथांत दिली आहे, त्यात अश्मक हे नावही आहे. त्या वेळी अश्मक गोदावरीच्या वरच्या भागाच्या काठी राहत असत, असा उल्लेख आहे. अश्मकांची राजधानी पैठण होती. 

याशिवाय भोज, महाभोज, सत्तीयपुत्त, पेत्तोनिक, केरळपुत्त, पाण्डय, चोल इत्यादी दक्षिणेकडील लोकांचा उल्लेख अशोकाच्या शिलालेखात आला आहे. भोज हे मुळचे मथुरेचे. भोसले हे आडनाव भोज या शब्दावरूनच आलं आहे. मथुरेजवळच सात्वत नावाचे लोक राहत. सत्तीयपुत्त म्हणजे सात्वतपुत्र. सात्यकी हा सात्वत कुळातच जन्मला. यादवांचा आणि सात्वतांचा संबंध होता. पेत्तेनिक म्हणजे प्रतिष्ठानचे, अर्थात पैठणकडील लोक. पाण्ड्य हे दक्षिणेकडील. त्यांचा उल्लेख कात्यायन आपल्या वार्तिकांत करतो. 

वैश्यांपैकी दक्षिणेत वसाहत करण्यास जे आले त्यांच्यामध्ये मुख्य आभीर होते. आभीर मूळचे उत्तरेकडचे. ते सिंधुनदीच्या काठी राहत असत, असा महाभारतात उल्लेख आहे. त्यांचा आणि तत्कालीन आर्यांचा फारसा सलोखा नसावा. त्यांच्याकडे ते शत्रुत्वाचा नजरेनं पाहत असत. सरस्वती नदी जी एकदम अदृश्य झाली ती या आभीर लोकांच्या दुष्टपणामुळेच, परंतु त्यांचा मूळचा युद्धप्रिय असा स्वभाव असल्यानं त्यांची गणना चांगल्या योद्ध्यांमध्ये होत असे, व ते दस्यू जातीतले असूनसुद्धा त्यांचा उपयोग व्हावा म्हणून आर्य त्यांना आपल्या सैन्यात सामील करून घेण्यास उत्सुक असत, असं महाभारतात सांगितलं आहे. द्रोणाचार्यांनी जो सुवर्णव्यूह रचला त्यात या आभीर जातीच्या दस्यूंना त्यांनी प्रमुख स्थान दिलं होतं. दुसर्‍या एका आभीरांच्या टोळीनं अर्जुन द्वारकेहून श्रीकृष्णाच्या विधवापत्नींबरोबर परत येत असताना त्यांच्यावर हल्ला केल्याचं महाभारतात लिहिलं आहे. अभीरांना लुटारू, गवळी, गुराखी, म्लेंच्छ इत्यादी नावांनी महाभारतात संबोधलं आहे. बाप ब्राह्मण आणि आई अम्बष्ठ यांपासून झालेल्या संततीस मनुस्मृतीत आभीर असं संबोधलं आहे.

यावरून असं लक्षात येतं की, आभीर कोणीतरी कडवे, लढवय्ये, सतत फिरणारे असे लोक असावेत. आणि इतर शक, ग्रीक, यूएची, कांबोज इत्यादी जातींचे लोक जसे हिंदुस्थानात उतरले, तसे त्यांच्याबरोबर हेही उतरले असावेत, व त्यानंतर पंजाबात त्यांनी सिंधू नदीच्या काठी वस्ती केली असावी. हे साधारण इसवी सनाच्या सुरुवातीला घडलं असावं. दुसर्‍या व तिसर्‍या शतकांतील शिलालेखांत आभीरांसंबंधी उल्लेख सापडतात. इ. स. १८१मधील क्षत्रप राजा रुद्रसिंह याच्या लेखात रुद्रभूति नावाच्या त्याच्या आभीर सेनापतीचा उल्लेख आहे. शिवदत्ताचा मुलगा ईश्वरसेन हा आभीर होता अशी माहिती इ. स. ३००च्या नाशिकच्या लेण्यांतल्या शिलालेखात मिळते. इ. स. ३६०मध्ये समुद्रगुप्ताने अलाहाबाद इथे एका स्तंभावर एक लेख कोरवला होता. गुप्त साम्राज्याच्या मर्यादेपलीकडे दक्षिणेस आणि नैऋर्त्येस राजस्थान आणि माळवा प्रांतांत मालव आणि आभीर या दोन जाती नांदतात असं या लेखात म्हटलं होतं. पंजाबात सिंधू नदीच्या काठी इसवी सनाच्या सुरुवातीला आभीर लोक राहत होते, असं मानलं तर त्यांना माळव्यात पोहोचायला तीनशे वर्षं लागली. यांपैकी काही लोकांनी तिथेच स्थायिक होण्याचं ठरवलं असावं, हे नाशिकच्या शिलालेखावरून स्पष्ट होतं. झांशीच्या दक्षिणेस अहिरवाड आणि अहारवाड अशी जी दोन गावं आहेत, ती संस्कृतातील आभीरवाटिका या शब्दावरून आली आहेत. काही टोळ्यांनी इथे राज्यं स्थापन केली असावीत, आणि काही टोळ्या पुन्हा दक्षिणेस आणि पश्चिमेस गेल्या असाव्यात. कारण आठव्या शतकात ज्या वेळेस सौराष्ट्रावर हल्ला झाला त्या वेळी तो प्रांत आभीरांच्या ताब्यात होता, असं एन्थोव्हेन आपल्या Castes and Tribes in Bombay Presidency या पुस्तकात म्हणतो. हेच आभीर लोक दक्षिणेकडे आल्याचा पुरावाही तो देतो. खानदेशातील असीरगड हा अस-अहीर या आभीर जातीतल्या पुरुषानं बांधल्याचं फेरिस्ता आपल्या इतिहासात लिहितो. दक्षिणेत सहाव्या सातव्या शतकापर्यंत आंध्रभृत्य राजे राज्य करत होते. त्यांच्या राजवटीनंतर आभीरांची राजवट महाराष्ट्रात सुरू झाली, असा उल्लेख काही पुराणांत सापडतो.

पुराणांमध्ये आभीर राजे म्हणून ज्यांचा उल्लेख येतो, त्यांच्यापैकीच एक शाखा त्रैकुटकांची असावी. इ. स २५०च्या सुमारास क्षत्रप कुलानंतर त्यांचा उदय झाला. अणि हैहय या नामाभिधानानं त्यांनी आपलं राज्य स्थापन करून त्रिकुट या शहरास आपली राजधानी केली. हे घडलं इ. स. ४५५-४५६मध्ये. उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातेत त्यांनी आपला अंमल पुढे सुमारे शंभर वर्षं, चालुक्यांकडून त्यांना बाधा येईपर्यंत निर्वेध चालवला. त्रिकुट म्हणजे पुण्याजवळचं जुन्नर. अशा प्रकारे महाराष्ट्रातलं वसाहतकर्म इ. स. ६००मध्ये पूर्ण झालं. 

वसाहत कायम, स्थिर झाली म्हणजे साहजिकच राजदंडाची आवश्यकता निर्माण होते. महाराष्ट्रावर पहिली सत्ता मौर्यांची होती. याबद्दल ठोस असा पुरावा शिलालेखांतून मिळतो. सम्राट अशोकाने आपल्या स्वभावात नैतिक परिवर्तन झाल्याचे लेख आपल्या साम्राज्याच्या चारही टोकांवर प्रजेचे मन हिंसेपासून वळवण्यासाठी त्या त्या प्रांताच्या बोलींत खोदवले होते. या लेखांपैकी एक ठाणे जिल्ह्यात सोपारा इथे, दुसरा महाराष्ट्राच्या पूर्व सरहद्दीवर जबलपुराकडे रुपनाथ इथे, तिसरा आग्नेयीच्या कोपर्‍यात मस्की इथे आणि चौथा महाराष्ट्राच्या दक्षिण टोकास सिद्धापूर इथे, असे महाराष्ट्राच्या चार सीमांतांवर खोदवले आहेत. यावरून हा प्रांत अशोकाच्या साम्राज्यात येत असावा. अशोकानंतरच्या बिंदुसार राजाने जरी आक्रमण केलं नाही तरी पुढच्या चंद्रगुप्त मौर्याची सत्ता महाराष्ट्रावर होती. मौर्यसत्तेचा व मौर्य घराण्याचा स्मृत्यवशेष मोरे या आडनावात राहिला आहे. मौर्यांची सत्ता ख्रिस्तपूर्व ३२१पासून १८४पर्यंत होती.
क्रमशः             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा