गुरुवार, २६ मार्च, २०१५

महाराष्ट्राचा इतिहास व मराठीची उत्पत्ती- भाग-4

या प्रांतांचे उल्लेख फार प्राचीन काळापासून आढळून येतात. छान्दोग्योपनिषदात कौण्डिण्य नावाच्या ऋषीचा उल्लेख आहे. त्याच्या नावावरून कौण्डिण्यपूर हे गाव वसलं. हेच पुढे नलदमयंतीच्या वेळी भीष्मकाची राजधानी म्हणून प्रसिद्धीस आलं. कलिंग (पूर्वेकडील कोकणपट्टी) व अपरान्त यांचेही असेच उल्लेख सापडतात. महाराष्ट्रे तीन होती व ती अश्मक, कलिंग व अपरान्त असा उल्लेख महाभारतात आहे.
प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे - अश्मक
विदर्भाची विदर्भ, कैशिक, भोज, भोजकट, वर्धातट व महाराष्ट्र अशी सहा नावं आहेत, व विदर्भ आणि महाराष्ट्र ही नावं समान अर्थानं वापरली आहेत. त्याला आधारही जुन्या ग्रंथांत मिळतो. राजशेखर कवीच्या बालरामायण नावाच्या नाटकात एक प्रसंग आहे. पुष्पक विमानात बसून श्रीराम, सीता व सुग्रीव हे तिघं लंकेहून परत जात असता सुग्रीव प्रत्येक देशाचं वर्णन करतो -
सुग्रीव - भरताग्रजायमग्रे महाराष्ट्रविषय: ।
राम - सोऽयम् सुभ्रु परो विदर्भविषय: सरस्वतीजन्मभू: ।
सीता - यत्रोत्पना मे पितामहश्वशुरस्य गृहिणीन्दुमती ।
त्याचप्रमाणे मुरारी हा कवीही आपल्या अनर्घ्यराघव या नाटकात इदमग्रे महाराष्ट्रमण्डलैकमण्डनं कुण्डिननाम नगरम् । असा, कुंडिननगर ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून उल्लेख करतो.
विदर्भ म्हणजे महाराष्ट्र असे जसे उल्लेख सापडतात तसेच अपरान्त म्हणजे महाराष्ट्र असे उल्लेखही सापडतात. यावरून महाराष्ट्र या देशाची व्याप्ती नीट ठरली नव्हती, असं दिसतं. महाभारतात गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या उपभागांचा उल्लेख आहे. गोपराष्ट्र म्हणजे गोपांचा देश. मथुरेजवळच्या गोपांचे हे भाऊबंद असावेत. नाशिकजवळचा हा प्रदेश होता. दुसरं मल्लराष्ट्र. हे मल्ल रानटी लोक होते. त्यांचं निर्दालन खंडोबानं केलं म्हणून त्याला मल्लारी हे नाव मिळालं. मल्ल हा शब्द अनेक नावांच्या शेवटीही येतो. मल्ल याचा अर्थ पर्वत असाही होतो, तेव्हा मल्लराष्ट्र म्हणजे डोंगराळ प्रदेश, असा अर्थही संभव आहे. गोपराष्ट्राच्या खाली हे मल्लराष्ट्र होतं. पांडुराष्ट्र म्हणून जो उल्लेख येतो, तो पाण्ड्यांच्या प्रदेशाबद्दल आहे. सध्याच्या तामिळनाडूतील हा भाग. याचाही अंतर्भाव तेव्हा महाराष्ट्रात होत असावा. याशिवाय, समुद्रगुप्ताच्या एका शिलालेखात देवराष्ट्राचा उल्लेख आहे. हे देवराष्ट्र सातारा जिल्ह्यात दक्षिणेला आहे. ही सर्व राष्ट्रं व अस्मक, अपरान्त, विदर्भ मिळून महाराष्ट्र बनला होता.
आर्यांची जी वस्ती दक्षिणेस झाली ती काही एकदम व सर्व ठिकाणी सारखी अशी झाली नाही. क्रमाक्रमानं सावकाश व दीर्घ कालावधीनं जसजसं तिथलं जंगल कमी होऊन भूभाग वसाहतयोग्य होऊ लागला तसतसे आर्य आपला शिरकाव दक्षिणेत पुढे पुढे करू लागले. स्थूलमानानं व निसर्गाचे निर्बंध लक्षात घेता महाराष्ट्राचे भाग उत्तरेकडून दक्षिणेकडे नागपूर-विदर्भ, गोदाकाठ, भीमाकाठ, कृष्णाकाठ, उत्तर कोकण, दक्षिण कोकण इतके पडतात, व याच क्रमाने आर्यांनी तिथे वसाहती केल्या. याला अपवाद फक्त कोकण. देशापेक्षा फार अगोदर कोकणपट्टीवरील प्रांत वसवला गेला होता. एवढंच नव्हे तर व्यापारउदीम वगैरे व्यवहाराच्या दृष्टीनं इतर तत्कालीन देशांतील लोकांनाही तो परिचित झाला होता. शिवाय, उत्तरेचं दळणवळण कोकणाशी होण्यास तिथला मार्गही विशेष बिकट नव्हता. उत्तरेकडील आर्य किंवा पुढे जे जे लोक वसाहतीसाठी दक्षिणेत येऊ शकले ते या कोकणपट्टीच्या मार्गानेच येत. तेव्हा हा प्रांत फार अगोदर वसवला गेला, यात शंका नाही.
आर्यांच्या पूर्वी विंध्याच्या दक्षिणेस कोण लोक राहात होते व ते तेथे कुठून आले यासंबंधी संशोधकांमध्ये एकवाक्यता नाही. युरोपीय संशोधकांचा असा समज आहे की, आर्य ज्या वेळी आपल्या मूळ वसतिस्थानाहून निघाले व इतर वसाहतयोग्य प्रांतांत ठिकठिकाणी राहू लागले, त्या वेळी जशी एक लोकक्रांती झाली, तशीच जबरी लोकक्रांती मध्य आशियातून द्राविडी किंवा सुमेरी अथवा तुराणी संस्कृतीचे लोक आर्यांच्या पुष्कळ पूर्वी इतस्तत: फ़िरू लागले त्या वेळी झाली. तेच लोक आर्यांप्रमाणे हिंदुस्थानाकडे वळले आणि उत्तरेकडील पर्वतांच्या दर्‍याखोर्‍यांमधून आत शिरून राहिले. मागाहून जसजसा आर्यांचा रेटा येऊ लागला तसतसे ते उत्तरेकडील डोंगरांच्या खबदाडीत व दक्षिणेकडे विंध्यपार होऊ लागले. अशा रीतीनं दक्षिणेकडे दोन लोकांच्या निरनिराळ्या भिन्न काळी वसाहती झाल्या. एक आर्येतर द्राविडी वगैरे लोकांची आणि दुसरी आर्यांची. या दोन्ही वसाहतींचे नक्की काळ सांगणं कठीण आहे.